
मुंबई प्रतिनिधी
“आईनंतर जी व्यक्ती आपली वाटते, ती म्हणजे आजी…” या वाक्यात सामावलेलं प्रेम, जिव्हाळा आणि मायेचं नातं आज गोरेगावमध्ये थरथर कापायला लावणाऱ्या एका अमानवी प्रकारामुळे चुरगळून टाकण्यात आलं आहे. मुंबईसारख्या संवेदनशील, संस्कारी शहरात माणुसकीला काळं फासणारं कृत्य घडलंय. एका नातवाने आपल्या आजीला थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
६० वर्षांच्या यशोदा गायकवाड या महिलेला गोरेगावमधील आरे कॉलनीजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अस्वस्थ अवस्थेत फेकलेलं आढळून आलं. त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या या वृद्धेच्या देहावर जखमा होत्या, पण मनावरचे घाव आणखी खोल होते. आपल्याच रक्ताच्या गोष्टीने अशी वागणूक मिळावी, ही कल्पनाच काळजाला चीरून टाकणारी आहे.
स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यशोदा गायकवाड यांना तातडीनं कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मायेच्या नात्याला काळिमा
प्राथमिक चौकशीत यशोदा गायकवाड यांनी मालाड परिसरात आपल्या नातवासोबत राहत असल्याचं सांगितलं. मात्र, वृद्ध आजीच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने नातवाने असा अमानुष मार्ग निवडला, ही बाब मन सुन्न करणारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घरी पोहोचल्यावर कुलूप आढळलं असून, नातव व कुटुंबीय फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक तयार करण्यात आलं असून, लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
समाजाने अंतर्मुख होण्याची वेळ
ज्यांच्या मांडीवर खेळत बालपण गेले, त्या आजीला कचऱ्यात फेकण्यासारखी घटना केवळ कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही, तर ही आपल्या सामाजिक अधःपतनाची शोकांतिकाच आहे. माणुसकी, करुणा, आणि कुटुंबातील वृद्धांना आधार देण्याची जबाबदारी झटकून टाकणाऱ्या या घटनेमुळे समाजाने आत डोकावून पाहणं गरजेचं झालं आहे.
ही एक घटना नाही, हा आरसा आहे
यशोदा गायकवाड यांची कहाणी म्हणजे हजारो उपेक्षित वृद्धांच्या वेदनांचा एक प्रतिनिधी आवाज आहे. त्यांचं दुखणं केवळ त्वचेवरच नाही, तर आत्म्यावर आहे. माणुसकीपासून, आपल्या लोकांपासून फसवणुकीचं.
ही घटना आपल्याला झोपेतून जागं करतेय. आता वेळ आली आहे वृद्धांच्या सुरक्षेसाठी, आधारासाठी आणि सन्मानासाठी एक, भक्कम व्यवस्था उभी करण्याची. कारण ही लाजिरवाणी घटना केवळ यशोदा गायकवाड यांच्यापुरती मर्यादित नाही, ती आपलीही जबाबदारी आहे.