
मुंबई प्रतिनिधी
समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. नागपूर–गोवा दरम्यान उभारण्यात येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात देशातील सर्वात लांब बोगदा विकसित होणार असून त्यामुळे आजरा ते बांदा या मार्गावरील ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
बोगद्याच्या माध्यमातून प्रवासात मोठी बचत
सध्या आजरा–बांदा या ३९ किमी अंतरासाठी सुमारे ९० मिनिटे लागतात. मात्र, शक्तीपीठ महामार्गातील ३० किमी लांबीच्या दोन बोगद्यांमुळे हा वेळ फक्त २० मिनिटांवर येणार आहे. हे बोगदे आंबोळीच्या परिसरात चौथ्या टप्प्यात उभारण्यात येणार आहेत.
१२,००० कोटींचा निधी मंजूर
८०२ किमी लांबीच्या नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने १२,००० कोटी रुपयांचा भूसंपादनासाठी निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला आहे.
शेतकऱ्यांचा विरोध कायम
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, सरकारकडून प्रकल्प रेटण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुविहित वाहतूक आणि पर्यटनवृद्धी या हेतूने सरकार प्रकल्पावर ठाम आहे.
प्रगतीच्या दिशेने एक मोठे पाऊल
देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा महाराष्ट्रात होणे ही राज्याच्या प्रगत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांतील गुंतवणुकीची ओळख ठरणार आहे. या बोगद्यामुळे पर्यावरणपूरक आणि वेळबचत करणारा मार्ग तयार होणार असून, कोकण व विदर्भ एकमेकांशी अधिक वेगाने जोडले जाणार आहेत.