
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील ऐतिहासिक पण जर्जर झालेल्या कामाठीपुरा भागातील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. म्हाडाच्या ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’मार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प सध्या मुंबईतील सर्वात मोठा समूह पुनर्विकास उपक्रम ठरणार आहे.
गुरुवारी यासाठी बांधकाम आणि विकास एजन्सी निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकदा प्रकल्प पूर्ण झाला, तर 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे.
३४ एकरचा विस्तार, ८०० जमीनमालक
कामाठीपुरा येथील गल्ली क्रमांक १ ते १५ या परिसरातील 943 उपकरप्राप्त इमारती या पुनर्विकासात सहभागी होणार आहेत. यामध्ये 662 निवासी व 1376 अनिवासी सदनिकांचा समावेश आहे. या भागातील बहुतांश इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या असून, एकूण भूखंड क्षेत्र 73,144.84 चौरस मीटर आहे.
याठिकाणी लहान व अरुंद भूखंडांमुळे स्वतंत्र पुनर्विकास अशक्य झाल्याने समूह पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे.
जमीनमालकांना भरघोस मोबदला — प्रत्येकी ४ किंवा अधिक घरे
प्रकल्पात भूखंडाच्या आकारानुसार जमीनमालकांना खालील प्रमाणात घरे देण्यात येणार आहेत:
50 चौ.मी.साठी – 1 घर (500 चौ. फुट),
51 ते 100 चौ.मी. – 2 घरे,
101 ते 150 चौ.मी. – 3 घरे,
151 ते 200 चौ.मी. – 4 घरे,
त्यानंतर दर 50 चौ.मी.ला – 1 अतिरिक्त घर,
म्हाडाला मिळणार मध्यवर्ती मुंबईत मोठा हिस्सा
या प्रकल्पामध्ये म्हाडाला विकासकाकडून तब्बल 44,000 चौ.मीटर क्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे म्हाडाकडे मुंबईत भरपूर घरांचा साठा तयार होणार असून, उपयुक्त सामाजिक गृहनिर्माणाला चालना मिळणार आहे.
दुसरीकडे विकासकाला 5,67,000 चौ.मीटर क्षेत्र उपलब्ध होणार असून, यामध्ये अंदाजे 4500 नवीन फ्लॅट्स उभारले जातील.
रहिवाशांसाठी आधुनिक सोयीसुविधा
प्रकल्प डीसीपीआर 2034 च्या 33(9) नियमान्वये राबविला जात आहे. यासाठी सल्लागार म्हणून मेसर्स माहीमतुरा कन्सल्टंट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकल्पात फक्त घरेच नव्हे, तर व्यावसायिक संकुल, खेळाची मैदाने, मनोरंजनासाठी जागा व नागरी सुविधा देण्यात येणार आहेत.
कामाठीपुराचे रूपांतर एका आधुनिक टाऊनशिपमध्ये
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कामाठीपुराचा चेहरामोहराच बदलणार आहे. रहिवाशांना केवळ सुरक्षित आणि भक्कम घरे नव्हे, तर एक आधुनिक आणि दर्जेदार जीवनशैलीही मिळणार आहे.
मुंबईच्या मध्यवर्ती भागातील हा प्रकल्प, केवळ पुनर्विकास न राहता, एक सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.