
मुंबई प्रतिनिधी
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी शिवसेना (ठाकरे गट)च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपप्रणीत संचालक मंडळाने एकमताने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गटातील आणखी एक प्रमुख चेहरा भाजपकडे वळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर रिक्त झालेली संचालकपदाची जागा त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हा निर्णय “सद्भावनेतून” घेतल्याचे स्पष्टीकरण दिलं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर भाजप प्रवेशाच्या चर्चांमध्ये असल्याने, ही नियुक्ती राजकीय रंग घेऊ लागली आहे.
राजकीय हलचालींना गती?
संचालकपद मिळवण्यासाठी तेजस्वी घोसाळकर गेल्या वर्षभरापासून प्रयत्नशील होत्या. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांची नियुक्ती निश्चित झाली. भाजपच्या प्रभावाखालील संस्थेमध्ये मिळालेली ही जागा ठाकरे गटासाठी धक्का मानली जात असून, भाजपकडून एकप्रकारे राजकीय घरवापसीचे संकेत दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
प्रवीण दरेकर यांनी यावेळी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “मराठी माणसं, मराठी मतदार तुमच्याकडे आहेत, या भ्रमातून बाहेर या. भाजपला मिळालेला जनाधार हा मुंबईतील मराठी माणसांनी दिलेला आहे, तो पाकिस्तानी नाही,” अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं.
ते पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड उद्धव ठाकरे यांना टिकवता आला नाही. तो ब्रँड आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. मराठी माणसांचा विश्वास आता आमच्यावर आहे. राजकारणात चढ-उतार हे सामान्य आहेत, पण आज शिवसेनेचं नेतृत्व हतबल झालेलं आहे.”
भाजपच्या पुढाकारामुळे चर्चांना उधाण
तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती केवळ औपचारिक वाटत असली तरी, तिच्यामागे असलेली राजकीय पार्श्वभूमी आणि भाजपच्या रणनीतीमुळे ही निवड अधिक गहन वाटू लागली आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानायचा का? हा प्रश्न आता सत्ताकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय.