
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांना रोजच्या प्रचंड गर्दीतून दिलासा मिळणार आहे. मुंबईतील लोकल ट्रेनच्या दैनंदिन फेऱ्यांमध्ये लवकरच दुप्पट वाढ होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. तीन वर्षांच्या आत ही वाढ पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी यंदा तब्बल ८१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी एकट्या मुंबई आणि एमएमआर परिसरात सध्या १६ हजार कोटींची कामे सुरू आहेत. सध्या मुंबईत दररोज सुमारे ३२०० लोकल फेऱ्या घेतल्या जातात. त्या टप्प्याटप्प्याने वाढवून सुमारे ३०० नवीन लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
स्वयंचलित दरवाजांची चाचणी नोव्हेंबरमध्ये
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून नोव्हेंबर महिन्यात पहिल्या स्वयंचलित दरवाजासह लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे.
अडीच मिनिटांच्या अंतराने लोकल
सध्या प्रत्येक तीन मिनिटांनी एक लोकल धावत असते. हे अंतर कमी करून अडीच मिनिटांवर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मुंबई हे अशी यंत्रणा असलेले देशातील पहिले शहर ठरणार आहे.
नवीन ट्रॅक आणि सीबीटीसी यंत्रणा
रेल्वे प्रशासनाकडून ३५० किलोमीटर नवीन ट्रॅक टाकण्याचे काम सुरू असून, यामुळे उपनगरी रेल्वे सेवांची क्षमता वाढणार आहे. यासोबतच ‘कवच’ प्रणाली आणि सीबीटीसी (कॉम्बाईंड कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणा लागू करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. त्याचबरोबर लवकरच ३५० नवीन एसी लोकल ट्रेन सुरू करण्याचाही मानस आहे.
इंजिनमध्ये सहा हजार एआय कॅमेरे
पश्चिम रेल्वेच्या ९७८ इलेक्ट्रिक व डिझेल इंजिनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तब्बल ६ हजार कॅमेरे बसवले जाणार आहेत. या योजनेसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे कॅमेरे ३६० अंशात हालचालींचे निरीक्षण करतील. त्यामुळे अपघाताचे कारण शोधणे अधिक सोपे होणार आहे.