
मुंबई प्रतिनिधी
तब्बल १५ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या फरार आरोपीला अखेर ॲन्टाँप हिल पोलिसांनी गजाआड केलं आहे. अभिषेक उर्फ सनी प्रकाश दारोले (४४, रा. सायन कोळीवाडा) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. २०१० साली ॲन्टाँप हिल पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.
आरोपीने अनेक वर्षं आपली ओळख लपवत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं. मात्र, ॲन्टाँप हिल पोलिसांनी हा गुन्हा निष्क्रिय न ठेवता सातत्याने तपास सुरू ठेवला होता. पोलिसांनी कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास करत आरोपीचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपर्क साखळ्या शोधण्यास सुरुवात केली. यावेळी दारोले सध्या कर्जत परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु, प्रत्यक्षात तो तिथे मिळून आला नाही.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या एका अत्यंत गुप्त माहितीनुसार, अभिषेक दारोले आपल्या आजारी मावशी स्वाती चोरघे यांना भेटण्यासाठी येणार असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत योग्य क्षणाची वाट पाहत कारवाई केली. अखेर, अभिषेक दारोले पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
तपासादरम्यान त्याची ओळख पटवण्यात आली आणि तोच २०१० सालापासून फरार असलेला आरोपी असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई पोलिस उपायुक्त रागासुधा आर. (परिमंडळ ४), सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेंद्र धिवार (सायन विभाग), वरिष्ठ पोलिस निरीक्षक केशवकुमार कसार, गुन्हे निरीक्षक गोपाळ भोसले आणि पोलीस निरीक्षक समीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी,पो.उ.नि. अरफात सिद्दीकी (तडीपार अधिकारी)पोहवा गोरख सानप,पोहवा शिवाजी दहिफळे,पो.शि. अनिल राठोड,या कारवाईमुळे पोलिसांच्या चिकाटीचा आणि कार्यक्षम तपासाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. तब्बल दीड दशकांपासून फरार असलेल्या आरोपीला गजाआड करण्यास ॲन्टाँप हिल पोलिसांना अखेर यश मिळालं आहे.