
मुंबई प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या (ANC) पथकाने घाटकोपर आणि अंधेरी परिसरात मोठी कारवाई करत तब्बल २.०३ कोटी रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. एकूण १.१८ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, तिघा तस्करांना अटक करण्यात आली आहे.
३१ मे रोजी घाटकोपर बस स्थानकाजवळ संशयितांवर धाड टाकून ४१३ ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आला. पुढील तपासातून अंधेरी पश्चिम येथे छापा टाकून तिसऱ्या आरोपीकडून ६०५ ग्रॅम एम.डी. हस्तगत करण्यात आला.
या टोळीचा घाटकोपर आणि अंधेरी परिसरात मेफेड्रॉनचा अवैध व्यापार सुरू असल्याचे उघड झाले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबतची माहिती ‘९८१९१११२२२’ किंवा ‘१९३३’ वर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.