
नवी दिल्ली वृत्तसंस्था
उत्तराखंडच्या कोटद्वार परिसरात मानवी नात्यांना काळिमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका डॉक्टर पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा निर्घृण खून करून मृतदेह जंगलात फेकून दिला. या क्रूरतेमागचं कारण म्हणजे केवळ तीन कोटींच्या बंगल्याचा वाद!
मृत व्यक्तीची ओळख आणि पार्श्वभूमी
मुरादाबाद येथील रहिवासी रवींद्र कुमार (वय ५६) यांचा रामगंगा विहारमधील पॉश कॉलनीत सुमारे ३ कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला होता. त्यांनी तो बंगला विक्रीसाठी ठेवला होता. मात्र, त्यांच्या पत्नीला हा निर्णय मान्य नव्हता.
प्रेमसंबंधातून घडलेलं शिजत गेलेलं कटकारस्थान
रवींद्र कुमार यांच्या पत्नी रीना सिंधू (वय ३६) यांची ओळख परितोष कुमार (वय ३३) नावाच्या तरुणाशी झाली. परितोष बिजनौर जिल्ह्यातील थाना नगीना येथील सराई पुरानी गावचा रहिवासी असून, तो रीनाच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट म्हणून आला होता. हळूहळू या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. हे संबंध इतके खोलवर गेले की, दोघांनी मिळून रवींद्र कुमार यांच्या हटवण्याचा निर्णय घेतला.
हत्येचा थरारक तपशील
पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, रीनाने पतीला आधी मद्यपान करायला लावले आणि नंतर त्याची हत्या केली. नंतर परितोषच्या मदतीने रवींद्र कुमार यांचा मृतदेह SUV गाडीतून कोटद्वारच्या जंगलात नेऊन फेकून देण्यात आला.
पोलीस तपास आणि अटक
जंगलात सापडलेल्या मृतदेहाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. काही तासांतच सत्य समोर आले आणि तपास यंत्रणांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणाने कोटद्वारसह मुरादाबाद आणि बिजनौर परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर समाजात संताप
एका डॉक्टर पत्नीने आपल्या वैद्यकीय पेशाचं भान विसरून केवळ मालमत्तेसाठी अशा थरारक खुनाचं कारस्थान रचल्याची बाब समाजमन हादरवणारी ठरत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलीस अधिकाऱ्यांनी लवकरच आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे.