
मालेगाव, प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावर व्यापाऱ्याच्या कारला अडवून सुमारे २५ लाखांची लूट केल्याप्रकरणी सहा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)’ अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास झपाट्याने पुढे नेत, मालेगाव पोलिसांनी आतापर्यंत ११ लाखांची रोकड, एक आयफोन आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही धक्कादायक घटना २३ मार्च २०२५ रोजी संकेत ट्रेडर्सचे व्यापारी मनोज मुथा आणि त्यांचे भाऊ प्रवास करत असताना घडली. त्यांची कार थांबवून आरोपींनी त्यांच्याकडून २५ लाख रुपये लंपास केले होते.
या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात हर्षल देविदास जाधव, किशोर देविदास सूर्यवंशी, महेंद्र मधुकर सोनवणे, राहुल संजय खैरनार, कुणाल रघुनाथ पाटील आणि विशाल सुभाष पवार या सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील विशाल हा लूटीनंतर पलायन करत फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यालाही अटक करून न्यायालयात हजर केले.
दरम्यान, या आरोपींना १३ जून रोजी प्रथम न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १८ जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हेगारी कारवाई सुरू असून, लवकरच उर्वरित रक्कम आणि इतर पुरावे हस्तगत करण्यासाठी पोलिसांची तपासयंत्रणा कार्यरत आहे.