
पुणे प्रतिनिधी
वारकरी संप्रदायातील सर्वात पवित्र आणि भाविकांच्या श्रद्धेचा महापर्व असलेल्या आषाढी वारीला यंदा 18 जूनपासून सुरुवात होणार असून, ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या पायी वारीचे संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. देवशयनी आषाढी एकादशी यंदा 6 जुलै रोजी असल्याने त्याआधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या वारीसाठी राज्यभरातील भाविकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लाडक्या विठोबाच्या भेटीसाठी ‘ज्ञानोबा-तुकोबा’ म्हणत टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनीही शेतीची कामं आटोपून वारीची वाट धरली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक (2025):
18 जून – प्रस्थान, देहू; मुक्काम इनामदार वाडा
19 जून – देहू ते आकुर्डी; मुक्काम आकुर्डी
20 जून – आकुर्डी ते नाना पेठ, पुणे
21 जून – पुणे निवडुंगा विठ्ठल मंदिर; मुक्काम
22 जून – हडपसर, लोणी काळभोर; मुक्काम
23 जून – लोणी काळभोर ते यवत
24 जून – यवत ते वरवंड चौफुला
25 जून – वरवंड ते उंडवडी गवळ्याची
26 जून – उंडवडी ते बारामती
27 जून – बारामती ते काटेवाडी, सणसर (मेंढी-बकरी रिंगण)
28 जून – सणसर, बेलवाडी, निमगाव केतकी (पहिले गोल रिंगण)
29 जून – निमगाव केतकी ते इंदापूर (गोल रिंगण)
30 जून – इंदापूर ते सराटी
1 जुलै – सराटी ते अकलूज (गोल रिंगण, सोलापूर प्रवेश)
2 जुलै – अकलूज ते बोरगाव (उभे रिंगण – माळीनगर)
3 जुलै – बोरगाव ते पिराची कुरोली
4 जुलै – पिराची कुरोली ते वाखरी (उभे रिंगण – बाजीराव विहीर)
5 जुलै – वाखरी ते पंढरपूर
6 जुलै – आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान
10 जुलै – परतीचा प्रवास – देहू
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक (2025):
19 जून – प्रस्थान आळंदी; संध्याकाळी 8 वाजता
20 जून – आळंदी ते पुणे
21 जून – पुणे मुक्काम
22 जून – पुणे ते सासवड (दिवेघाट खेळ)
23 जून – सासवड मुक्काम
24 जून – सासवड ते जेजुरी (भंडाऱ्याची उधळण)
25 जून – जेजुरी ते वाल्हे (खंडोबा दर्शन)
26 जून – वाल्हे ते लोणंद (सातारा जिल्हा प्रवेश)
27 जून – लोणंद ते तरडगाव
28 जून – तरडगाव ते फलटण
29 जून – फलटण ते बरड
30 जून – बरड ते नातेपुते (गोल रिंगण)
1 जुलै – नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर – गोल रिंगण)
2 जुलै – माळशिरस ते वेळापूर (खुडूस – गोल रिंगण)
3 जुलै – वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूरबुवा समाधी दर्शन व बंधू भेट)
4 जुलै – भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर – उभे रिंगण)
5 जुलै – वाखरी ते पंढरपूर (गोल रिंगण, मुक्काम)
6 जुलै – आषाढी एकादशी
10 जुलै – परतीचा प्रवास – आळंदी
वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह
वारीचा सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं तीर्थक्षेत्र. उष्णता, पाऊस आणि थकवा विसरून विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले हे वारकरी म्हणजे श्रद्धेचं अद्वितीय उदाहरण आहे. वर्षभर प्रतीक्षा करून हेच दिवस वारकऱ्यांच्या जीवनात आनंद ओततात. टाळ-चिपळ्यांच्या गजरात, “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा जयघोष करत ही वारकऱ्यांची महासंधी आता सुरू होणार आहे.
पंढरपूर नगरी आता पुन्हा एकदा भक्तिभावाने फुलणार, चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांचा महासागर लाटांसारखा भरून वाहणार!