
•”वाचलेल्या तरुणींचा थरकाप उडवणारा अनुभव
•पूल हलायला लागला आणि पुढच्याच क्षणी कोसळला…”
पुणे, प्रतिनिधी
इंद्रायणी नदीवर कुंडमाळ येथे उभारलेला पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच हाहाकार माजला. मुसळधार पावसाने आधीच रौद्ररूप धारण केलेल्या इंद्रायणीला पूर आला असतानाच पर्यटकांच्या गर्दीने ओथंबलेला पूल अचानक कोसळल्याने अनेकजण नदीपात्रात वाहून गेले. काहीजणांचा थरकापजनक बचाव झाला असून, एनडीआरएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं.
या दुर्घटनेतून बचावलेल्या महिलांनी आणि युवकांनी आपले अनुभव सांगताना अनेकांच्या अंगावर काटा आला.
“पूल अचानक हलायला लागला…”
या दुर्घटनेतून वाचलेल्या एका महिलेनं माध्यमांची बोलताना सांगितलं, “पूल कोसळण्यापूर्वी मोठी गर्दी होती. लोक चालत होते, काहीजण गाड्यांमध्ये होते. अचानक पूल हलायला लागला आणि क्षणातच तो कोसळला. मी पुलावरच होते. नशीब बलवत्तर म्हणून वाचले, पण माझा नवरा आणि मुलगा कुठे आहेत, हे अजूनही माहित नाही. हात फ्रॅक्चर झाला असून उपचार सुरू आहेत.” तिचा चेहरा अजूनही भयभीत होता.
“मी रॉडला धरून जीव वाचवला”
दुसरा युवक अमोल घुले म्हणतो, “पूल कोसळण्याच्या पाच मिनिटं आधीच तो हलायला लागला होता. मी लोकांना सावध करायचा प्रयत्न केला पण कुणीही ऐकलं नाही. शेवटी पूल कोसळला. मी एका लोखंडी रॉडला घट्ट धरून राहिलो, त्यामुळे जीव वाचला. सध्या तळेगावमध्ये उपचार सुरू आहेत.”
“कोणी पोलिस नव्हते; पुलावर ५० हून अधिक लोक”
दिल्लीहून पुण्यात फिरायला आलेली लतिका सांगते, “पुलावर ५० पेक्षा अधिक लोक आणि गाड्या होत्या. आम्ही थोडेफार मागे असल्याने वाचलो. पुल कोसळतानाचा आवाज, लोकांचे किंचाळणं अजूनही कानात घुमतंय. समोरच अनेक लोक पाण्यात वाहून गेले.”
लतिकाने स्पष्ट केलं की पूल धोकादायक असल्याचा फलक तिथे लावलेला होता, पण तरीही वाहने त्यावरून जात होती. स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुनरावृत्ती टाळता आली असती का?
या दुर्घटनेनंतर प्रशासन, पर्यटक सुरक्षा आणि धोकादायक ठिकाणी होणारी गर्दी यावर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा दुर्घटना घडतात, पण जबाबदारीचं भान कधी येणार, हा प्रश्न उपस्थित होतोय.