
पुणे प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवारी (२० जून) पुण्यात होत असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. दिवसभर अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
या रस्त्यांवर वाहतूक बंद (२० जून – सकाळी ८ ते रात्री १२):
रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता)
खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)
गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता)
आपटे रस्ता
गोखले रस्ता ते टिळक रस्ता
लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक)
शनिपार चौक ते सेवासदन चौक
नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक
देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक (गणेश रस्ता)
रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर (नेहरू रस्ता)
संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक
पालखी मुक्कामी रस्तेही राहणार बंद (२० ते २२ जून):
पालखी मुक्कामी आल्यानंतर नाना पेठ, भवानी पेठ आणि शनिवारवाडा परिसरातील रस्ते बंद राहणार आहेत. तसेच, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता छत्रपती शिवाजी रस्ता व लक्ष्मी रस्त्याचा (संत कबीर चौक ते बेलबाग चौक) काही भाग २२ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
विशेष उपाययोजना:
गर्दी नियंत्रणासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
दिंडीतील वाहनांना विशेष मार्गदर्शन
सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत देखरेख
ध्वनिवर्धक प्रणालीद्वारे नागरिकांना सतर्क सूचना
चोरी, गैरप्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक
वाहतूक मार्गातील बदलांची माहिती https://diversion.punepolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
या पार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, डॉ. संदीप भाजीभाकरे आणि वाहतूक निरीक्षक सुनील गवळी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहनचालक आणि नागरिकांनी नियोजित प्रवास करताना मार्ग बदल लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.