
मुंबई, प्रतिनिधी
अंधेरी पूर्वेतील मरोळ परिसरात असलेल्या ‘नाईट लव्हर्स रेस्टॉरंट अँड बार’ या डान्सबारवर मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान बारमध्ये ५० पेक्षा अधिक बारबाला अश्लील नृत्य करताना आढळल्या. तसेच बारमध्ये परवाना अटींचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईनंतर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार सध्या प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या हद्दीतील बार, रेस्टॉरंट व तत्सम आस्थापनांची तपासणी करत आहेत.
गुन्हे शाखा, मालमत्ता विभाग आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रात्रीच्या गस्तीदरम्यान संबंधित बारवर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान आढळून आले की, बारमध्ये चालणारी हालचाल ही पूर्णपणे बेकायदेशीर होती. बारचा परवाना असूनही तो परवान्याच्या नियमांचे पालन करत नव्हता. त्यामुळे हा बार उशिरापर्यंत सुरू होता, आणि स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीनंतर वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांच्यावर विभागीय चौकशी झाली असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चव्हाण यांची नियुक्ती नोव्हेंबर २०२४ मध्ये निवडणुकीपूर्वी दुसऱ्या ठिकाणी झाली होती. मे महिन्यातच त्यांची पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली होती.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीपाळीतील पोलीस निरीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, हद्दीतील बेकायदेशीर बार, डान्सबार, व बियर बार यांची तपासणी करून नियमबाह्य व्यवहार तत्काळ बंद करावेत.
मुंबई पोलिस दलात ही कारवाई ‘सतर्कतेचा इशारा’ मानली जात असून, येत्या काळात आणखी बार आणि संबंधित पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.