
मुंबई प्रतिनिधी
वाकोला परिसरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याबरोबरच परिसराचा सौंदर्यवृद्धीसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून, या कामाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते, विभागप्रमुख आणि आमदार अॅड. अनिल परब यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
शिवसेना विधानसभा संघटक आणि माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांच्या पुढाकारातून हे काम साकारले गेले आहे. उद्घाटन सोहळ्याला वाकोला विधानसभा संघटक शोभेन तेंडुलकर, वांद्रे विधानसभा समन्वयक व माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर, उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक दीपक (राजू) भूतकर, शाखाप्रमुख संतोष कदम, महिला शाखासंघटक सौ. अमिता आव्हाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसर अधिक देखणे व व्यवस्थित राहावा, यासाठी हे सुशोभीकरण करण्यात आले आहे,” असे सदा परब यांनी यावेळी सांगितले. आमदार अनिल परब यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा विधायक उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.
स्थानिक नागरिकांनी या सौंदर्यीकरणाचे स्वागत करत, परिसराच्या बदलत्या रुपाची समाधानाची भावना व्यक्त केली. सार्वजनिक हिताच्या कामात राजकीय इच्छाशक्ती आणि स्थानिक सहभाग महत्त्वाचा ठरतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.