
मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. आज कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगडला रेड अलर्ट, मुंबईसह विदर्भ घाटमाथ्यावरही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातही समुद्र सपाटीपासून 3.1 ते 7.6 किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळं मान्सून आता सक्रीय झाला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने विदर्भ, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मान्सूनची प्रगती होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई आणि पुणे शहरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. पुणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, वरंधा घाट शिरगाव परिसरात 113 मिलिमीटर पावसाची नोंद, तर लवासाकडे जाणा-या मुठा घाटात पावसाची धुवाँधार बॅटिंग झाली आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत, रस्ते वाहतुकीवरही कुठलाही परिणाम नाही.
या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
रेड अलर्ट- रायगड
ऑरेंज अलर्ट- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट- मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
विजांसह वादळी पावसाची शक्यता- बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
मुंबईसाठी इशारा
भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.