
मुंबई : प्रतिनिधी
लोकल प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य डब्यांप्रमाणेच फर्स्ट क्लास डब्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
फर्स्ट क्लास डब्यांचे तिकीट अथवा मासिक पास सर्वसामान्य डब्यांच्या तुलनेत अधिक महाग असते. त्यामुळे गर्दीपासून दूर आणि आरामदायक प्रवासासाठी अनेक प्रवासी फर्स्ट क्लासची निवड करतात. मात्र, तिकीट नसतानाही किंवा सर्वसामान्य डब्यांचे तिकीट घेऊन फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. परिणामी, जास्तीचा खर्च करूनही फर्स्ट क्लास तिकीटधारक प्रवाशांना उभं राहून किंवा प्रचंड गर्दीत प्रवास करावा लागतो.
याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आता फर्स्ट क्लास डब्यांत तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांसह तिकीट तपासणी पथक नियुक्त केले जाणार आहे. हे पथक गर्दीच्या वेळात प्रत्येक फर्स्ट क्लास डब्यात तपासणी करणार असून, प्रवाशांकडून तिकीट किंवा पास तपासले जाणार आहे.
तपासणीत योग्य तिकीट नसलेल्यांना तात्काळ दंड आकारण्यात येईल. तसेच दंड भरण्यास नकार दिल्यास संबंधित प्रवाशाला पुढील स्थानकावर उतरवण्यात येईल आणि पुढील कारवाईसाठी तिकीट तपासणी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेच्या या कारवाईमुळे विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर फर्स्ट क्लास डब्यांतून प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार असून, अधिकृत तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.