
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |शहरातील गोवंडी परिसरात शुक्रवारी एक भीषण अपघात घडला असून घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर एका डंपरने तिघांना चिरडलं. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर सिग्नलजवळ सदर घटना घडली. हे ठिकाण वर्दळीचं असून अपघाताच्या वेळी रस्त्यावर चहलपहल सुरू होती. अचानक एका डंपरने तीन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की तिघांनाही जागीच प्राण गमवावे लागले.
अपघातानंतर परिसरात संतप्त जमावाने रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. परिणामी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर दोन्ही दिशांनी वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत डंपरचालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पुढील तपास सुरू आहे.