मुंबई प्रतिनिधी
मुंबई |चेंबूर कॉलनी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली. एका जर्जर घराचे छत अचानक कोसळल्याने घरात राहणारे तिघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, त्यांच्यावर सध्या चेंबूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. संबंधित घरात एक ४० वर्षीय इसम आणि त्याची दोन अल्पवयीन मुले – काव्या (७) आणि मयंक (१२) – राहत होते. घराची स्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत धोकादायक होती. भाडेकरूंनी घरमालकाला वेळोवेळी घराची दुरवस्था लक्षात आणून दिली होती. मात्र, मालकाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे अखेर शुक्रवारी रात्री संपूर्ण छत कोसळले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने चेंबूर पोलिस व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले आणि जखमींना घराबाहेर काढले. तिघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
सध्या जखमींची प्रकृती गंभीर असून, पुढील तपास चेंबूर पोलीस करीत आहेत.


