
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रा कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात दोन वेगवेगळ्या हिरे व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरे विक्रीसाठी घेतल्यानंतर दलालांनी पैसे न देता पोबारा केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनेची तक्रार एकाच दिवशी दाखल करण्यात आली असून बीकेसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात ‘श्री रामदूत जेम्स एलएलपी’ या कंपनीचे मालक मनोजभाई अमदावादी (३८) यांची ३९ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. बीकेसीमध्ये असलेल्या त्यांच्या कार्यालयातून जयनिश प्रकाशभाई डहयानी (४०) या दलालाने हिरे विक्रीसाठी घेतले होते. तीन टप्प्यांत २४.६६ कॅरेट वजनाचे हिरे डहयानीकडे सोपवण्यात आले होते. मात्र विक्रीनंतरही पैसे न भरता डहयानी याने टाळाटाळ सुरू केली. अखेर, पैसे न मिळाल्याने अमदावादी यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी डहयानीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ (विश्वासघातकी गैरवर्तन) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात ‘जे.ए.एम्पेक्स’ या कंपनीचे मालक घनश्यामभाई कालसरिया (४६) यांची १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपनीकडे मागील तीन वर्षांपासून सिद्धार्थ रवासा हा दलाल हिरे खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून डिसेंबर २०२४ मध्ये कालसरिया यांनी २७.४१ कॅरेटचे हिरे विक्रीसाठी रवासा याच्याकडे दिले होते. मात्र त्यानेही पैसे न भरता वेळ काढत व्यवहार फसवला.
या प्रकरणी कालसरिया यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सिद्धार्थ रवासा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१६ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनांमुळे हिरे उद्योगातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दलालांवर अधिक काटेकोर नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.