
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व येथील प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र बुद्ध विहार विभागाच्या पुनर्विकास प्रकल्पात बुद्ध विहाराची जागा वाढवून मिळावी, यासंदर्भात शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख सुमित वजाळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. शिवेंद्रराजे भोसले यांची काल विशेष भेट घेतली.
या बैठकीत संबंधित मागणीवर सविस्तर चर्चा झाली असून, मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. बैठकीस प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र संस्थेचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
बुद्ध विहाराची जागा ही स्थानिक समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेता वाढवण्याची आवश्यकता असून, पुनर्विकासाच्या अनुषंगाने ही बाब प्राधान्याने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर तात्काळ विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.