
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कांदिवली येथील जानुपाडा भागात मंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवर आली. या घटनेमुळे पक्षात खळबळ उडाली असून, भाजपची निवडणूकपूर्व मोर्चेबांधणी प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
मंत्री आशीष शेलार हे कांदिवलीतील वनजमीन प्रकरणावर रहिवाशांची भेट घेण्यासाठी जानुपाड्यात आले असताना, त्यांच्या गाडीसमोरच भाजपच्या दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. वादाची ठिणगी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले निशा परुळेकर आणि देवांग दवे या दोन गटांमध्ये पडली. यावेळी निवडणूक समिती सदस्य देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. काही क्षणातच दवे आणि दरेकर समर्थकांमध्ये झटापटीची वेळ आली.
या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. वाद एवढा वाढला की दोन्ही गटांनी समतानगर पोलीस ठाणे गाठत परस्परविरोधी तक्रारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून वाद पक्षपातळीवरच मिटविण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकारामुळे भाजपच्या आंतरिक गटबाजीवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, आगामी महापालिका निवडणुकीत तिकीटवाटप हीच संघर्षाची ठिणगी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.