
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांच्या साठवण आणि प्रक्रियेची स्वतंत्र व्यवस्था करणे बंधनकारक असून, याबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, उपाहारगृहांवर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिला आहे.
“शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ साठवणे व शिजवण्याची प्रक्रिया ही स्वतंत्र असावी, असा स्पष्ट नियम अन्न सुरक्षा कायद्यात आहे. ही व्यवस्था न करणाऱ्या आस्थापनांवर परवाना रद्द करणे, दंड आकारणे अशा प्रकारची कठोर कारवाई केली जाईल,” असे नार्वेकर यांनी सांगितले.
राज्यातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एफडीएने तपासण्यांना वेग दिला आहे. ७ जून रोजी अन्न व औषध प्रशासनात १८९ नवीन अन्न सुरक्षा अधिकारी रुजू झाले असून, राज्यभरात हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या सुरू आहेत.
राज्यातील अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेविषयी जागरूक करण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. “गेल्या वर्षी ३० हजार अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यंदा हे प्रमाण वाढवून एक लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे,” अशी माहितीही नार्वेकर यांनी दिली.
“अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून ती ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध तात्काळ नोटीस बजावून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे,” असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.