
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | घाटकोपर रेल्वे स्थानकावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. चालत्या लोकलमधून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकून मृत्यू झाला. ही घटना फलाट क्रमांक १ वर सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्रवासी चालू लोकल ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तोल जाऊन तो थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तातडीने याची माहिती आरपीएफला दिली. जवानांनी धाव घेत पीडिताला बाहेर काढले आणि तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे स्थानकावर काही काळ हालचाल ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू असून प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चालत्या गाडीतून उतरणे धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.