
पुणे प्रतिनिधी
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची हजेरी अधूनमधून लागलेली असतानाच, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर जाणवणार आहे.
7 June, #Pune,#Solapur,#Sangli #Satara;mod to intense thunder clouds seen in latest satellite obs at 9am.#Possibility of #TS,Rain during nxt 3,4hrs in these areas.Pune district;#Baramati, #Daund,#Indapur watched pl#Mumbai #Thane,#Raigad intermittent showers during nxt 3,4hrs. pic.twitter.com/Q4hGMcM0RT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 7, 2025
आजपासून (7 जून) महाराष्ट्रातील विविध भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच पुणे आणि मुंबईसह काही शहरी आणि ग्रामीण भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यात पावसाचा जोर जाणवतोय.
पावसाचा परतीचा जोर वाढणार
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, नैऋत्य मोसमी पाऊस आता महाराष्ट्रात सक्रिय असून उत्तरेकडील जिल्ह्यांकडे त्याचा प्रवास सुरू आहे. राजस्थानजवळ चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय झाल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IMD पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या बारामती, इंदापूर, दौंड या भागांत तसेच मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने पुढील जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे:
पश्चिम महाराष्ट्र व कोकण
पुणे, रायगड, नाशिक, ठाणे, पालघर, रत्नागिरी
विदर्भ व मराठवाडा
जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जालना
१३ ते १८ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, १३ जून ते १८ जून या कालावधीत महाराष्ट्रात सर्वदूर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकणपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नाले, ओढे वाहण्याइतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सावधगिरी बाळगा
राज्याच्या विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे, गरज नसताना घराबाहेर न पडणे, तसेच नदीकाठ, डोंगराळ किंवा कमी उंचीच्या भागात राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.