पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) प्रमाणपत्र आणि त्याबरोबरच्या परिशिष्टात आता गृहनिर्माण प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना प्रकल्पाबाबतची आवश्यक माहिती मिळावी, यासाठी ‘महारेरा’ने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणी प्रमाणपत्रात हे ग्राहककेंद्रित बदल केले आहेत.
प्रवर्तकाने प्रकल्पात केलेल्या दुरुस्त्या, मुदतवाढ आणि प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतर हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात असेल. प्रवर्तकांनी महारेरा प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर शोधता येते. याचबरोबर प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोडमध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकाबरोबर छापणे ‘महारेरा’ने पूर्वीच बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवता येते.
घर खरेदीदारांना मदत व्हावी, यासाठी ‘महारेरा’कडून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या नोंदणी प्रमाणपत्रांवरच प्रकल्पाबाबतच्या प्राथमिक आणि महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करायला ‘महारेरा’ने सुरुवात केली आहे. ग्राहकाने सजगपणे या बाबी समजावून घेऊन, त्यातील कायदेशीर बाबी तपासून घर खरेदी करावे. – मनोज सौनिक, अध्यक्ष महारेरा
नवीन महारेरा नोंदणी प्रमाणपत्रांची वैशिष्ट्ये
– प्रकल्प व प्रवर्तकाचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक ठळक स्वरूपात
– प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ
– इमारतीचे, विंगचे नाव अथवा क्रमांक
– प्रकल्पाचे निवासयोग्य मंजूर मजले
– निवासी अथवा अनिवासी इमारती
– बांधकाम परवानगी किती मजल्यांपर्यंत आहे, हे दर्शवणारे प्रमाणपत्र
– चारचाकी, दुचाकी, अभ्यागतांसाठी एकूण वाहनतळ


