
सातारा प्रतिनिधी
डोंगरपठारातील जनतेसाठी आनंदाची बातमी! अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पाटण-घाणबी-वन कुसवडे मार्गे सातारा एसटी बस सेवा लवकरच सुरू होणार आहे. ही बस सकाळी 7 वाजता धावणार असल्याची माहिती पाटण एसटी आगारप्रमुख दयाराम पाटील यांनी दिली.
या सेवेची मागणी डोंगरातील नागरिकांनी सातत्याने केली होती, आणि आता पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने ती प्रत्यक्षात साकारत आहे.
मुंबई, पुणे आणि साताऱ्याकडे नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या डोंगरी भागातील नागरिकांना थेट आणि वेळेत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर डोंगरी विभागाचे संपर्कप्रमुख रामभाऊ पवार, वन कुसवडेचे सरपंच गणपत यादव आणि सरपंच अशोक पवार यांनी नुकतीच शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांची मागणी लेखी निवेदनाद्वारे मांडली.
शंभूराज देसाई यांनी ही मागणी गांभीर्याने घेत तात्काळ पाटण आगारप्रमुख दयाराम पाटील यांना संपर्क साधून संबंधित मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याचे आदेश दिले. पाटील यांनी त्वरित प्रतिसाद देत, “लवकरच सकाळी 7 वाजता पाटणहून साताऱ्याकडे एसटी सेवा सुरू होईल,” असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे डोंगरपठारातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.