
अलिबाग प्रतिनिधी
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आणि शहाजी राजे उपस्थित होते. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण विभागाचे पोलीस विशेष महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधिक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी. यावेळी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरवात गुरुवारी दुपारी गडपुजनाने झाली. रायगड खोऱ्यातील २१ गावातील नागरीकांनी एकत्र येऊन गडपुजन केले. यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोंधळ तर जगदिश्वर मंदिरात किर्तन सोहळा संपन्न झाला. राज्यभरातील विवीध भागातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर करत शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. रात्री उशीरा राजसदरेसमोर शाहिरांनी पोवाडे सादर केले.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राज सदरेवर शाहिरांनी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी साडे दहाच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.
नंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालण्यात आले. नंतर या मुर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण करण्यात आले. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला सश्रस्त्र मानवंदना देण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय सोहळ्या लाखो शिवभक्त नागरीक , महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शंखनाद आणि तुतारीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी पारंपारीक वेषात मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप झाला. सोहळ्या निमित्ताने गडावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाचाड ते रायगड पायथा या दरम्यान वाहतुक नियमन करण्यात आले होते. दोन शिवभक्तांना चक्कर येऊन पडले होते. त्यांच्यावर आरोग्य पथकांनी तात्काळ उपचार केले.