स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई : बीकेसी येथील सेबी भवन परिसरात मागील काही दिवसांपासून अजगरांची पिल्ले दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पावसाळा सुरु झाल्याने उबेसाठी साप मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याचे चित्र यामध्ये दिसून येत आहे. शनिवारी पहिल्यांदा अजगराचे पिल्लू दिसल्यानंतर, मंगळवारी आणि बुधवारी मिळालेल्या सापडण्यांच्या घटनांमुळे हा आकडा थेट १२ वर पोहोचला आहे.
शनिवारी चार पिल्ले मिळाली होती, जी सेबी भवनातील सुरक्षा रक्षकांनी मिठी नदीजवळच्या खारफुटीच्या भागात सोडली होती. यानंतर मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास अजगराचे पिल्ले रस्त्यावर फिरताना दिसल्याने ‘वापरा’ संस्थेला माहिती देण्यात आली. संस्थेने तत्काळ वनविभागाचे राउंड ऑफिसर रोशन शिंदे आणि मुंबई रेंज कंट्रोल यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र अतुल कांबळे आणि माहीम पोलीस वसाहतीतील पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे घटनास्थळी दाखल झाले.
सर्पमित्रांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू मोहिमेदरम्यान सेबी भवनच्या परिसरात एक अजगर रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आला. उर्वरित पिल्ले दगडाखाली, गटाराच्या चेंबरमध्ये, तसेच सेबी भवनसमोरील गार्डनजवळच्या लाद्यांखाली लपलेली होती.
या मोहिमेत शनिवारी ५, मंगळवारी ६, आणि बुधवारी १ असे एकूण १२ अजगराचे पिल्ले मिळाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
सावधगिरीचा इशारा “रहिवाशांनी आपल्या परिसरात रस्त्यावर अथवा अडथळ्याच्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत. साप दिसल्यास स्वतःहून त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता नजीकच्या सर्पमित्र किंवा वनविभागाशी तातडीने संपर्क साधावा. असे सर्पमित्र अतुल कांबळे म्हणाले.
ही घटना वनविभाग व स्थानिक प्रशासनासाठीही एक इशारा ठरू शकते. शहरातील नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल राखण्याच्या दृष्टीने अशी प्राणी हालचाल अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे.


