
मुंबई प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या मालाड पोलिसांनी एका चोरीचा उलगडा केला आहे. यात चोरी करण्यासाठी चोराने वापरलेली शक्कल पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
मालाड पोलिसांनी चोरीच्या घटनेचा उलगडा करताना चोराला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
मुंबईच्या मालाड परिसरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात रंजीत कुमार उपेंद्र कुमार सिंग उर्फ मुन्ना (वय ४४) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबईच्या मालाड परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस मार्च महिन्यापासून या चोरट्याचा शोध घेत होते.
चोरी करण्यासाठी महिलांचे कपडे करायचा परिधान
तर आरोपी हा मोर्चा बिहारचा राहणारा असून तो मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात वास्तव्यास आहे. चोरी करण्यापूर्वी दिवसा परिसरात रेखी करून रात्रीच्या वेळी महिलेच्या वेश करत चोरी करून तो पळ काढत असे. या चोरट्याने मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दिंडोशी परिसरात अनेक चोऱ्या केल्या. हा चोरटा रेल्वे स्थानकाच्या परिसरात चोऱ्या करायचा. पोलिस आणि सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी तो रेल्वे रुळावर जाऊन महिलांची कपडे घालत असे. यात बुरखा किंवा साडी अशा कपड्यांचा वापर करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात
दरम्यान मागील एक महिन्यापासून मालाड पोलीस रेल्वे ट्रॅकवरील सीसीटीव्ही आणि सूत्रांच्या मदतीने तपास सुरु होता. १०० ते १५० सीसीटीव्ही तपासल्यानंतर महिलेच्या वेशातील संशयित दिसून आला. महिलेच्या वेशातील संशयित व्यक्ती मालवणी परिसरात जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आली. मालाड पोलिसांनी मालवणीत सापळा रचून आरोपीला मालवणीतून ताब्यात घेतले. संशयित व्यक्तीकडे चौकशी केली असता मालाड परिसरात एकूण आठ गुन्हे केल्याचे आरोपीने कबूल केले
४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
रणजीत कुमार सिंग उर्फ मुन्ना हा सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान मिळालेले सोने-चांदीचे दागिने तो त्याच्या घरात असणाऱ्या मशीनच्या साह्याने वितळवत असे. वितळवलेले सोने मुंबईतील काही ज्वेलरी दुकानांमध्ये विकत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याकडून हिरे जडवलेले ३६ तोळे सोन्याचे दागिने, १ किलो चांदी, बँकेतील १३ लाख रुपयांचा फ्रीज, सोने वितळण्याचे यंत्र, चाकू, हातोडा अशी घरफोडी करणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. ज्याची किंमत ४१ लाख रुपये आहे.