
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील काही भागातील पाणी पुरवठा सोमवार आणि मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनी जोडणी आणि झडप बसविण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून तसेच काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्यासोबतच आवश्यक पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहनही मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. जाणून घ्या नेमक्या कोणत्या विभागातील पाणी पुरवठा आणि कोणत्या वेळेत हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत 900 मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे तसेच 900 मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, 2 जून 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपासून मंगळवार, 3 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे.
या कालावधीत म्हणजे सोमवार, 2 जून 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपासून मंगळवार, 3 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत आर दक्षिण विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
या विभागात पाणीपुरवठा बंद
आर दक्षिण विभाग : ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) (नियमित पाणी पुरवठ्याची वेळ – सायंकाळी 6.25 ते रात्री 8.25) (दिनांक 2 जून 2025 रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील).मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कामामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.