
पुणे प्रतिनिधी
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, संबंधित महिलेने या प्रकरणी आपण माघार घेत असून हे माझं पर्सनल मॅटर, मला इथेच क्लोज करायचं आहे.
नोटिशीबाबतही मला इथेच थांबायचे आहे, असे सांगून तिने माघार घेतली. मात्र, त्यावरून आता राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट संजय शिरसाटांची कार्यपद्धतीच काढली आहे. ‘तिला धमकावलं असण्याची, तिला दबावात घेतलं असण्याची शक्यता आहे,’ असे आरोप अंधारे यांनी केले आहेत.
सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, लग्नासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही तिने म्हटले होते. त्यानंतर संबंधित महिलेने मला सात दिवसांच्या आत नांदायला न नेल्यास कारवाईचा करण्याचा नोटीशीद्वारे इशारा दिला होता. मात्र, संबंधित महिलेने आज या वादातून आपण माघार घेत असल्याचे सांगितले.
हा आमच्या घरातील माझं पर्सनल मॅटर आहे, मला ते इथेच क्लोज करायचं आहे. नोटिशीबाबतही मला इथेच थांबायचे आहे. माझ्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवू नये, असे सांगून संबंधित महिलेने या वादातून आपण माघार घेत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक होत संजय शिरसाटांचा राजीनामा मागितला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय शिरसाट यांच्या सुनेनेच शिरसाट आणि त्यांच्या मुलांवर गंभीर आरोप केले आहेत. काही वेळापूर्वी या आरोपातून संबंधित महिलेने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र, एकूणच संजय शिरसाटांची कार्यपद्धती आणि डांबरपटपणा पाहता, ते त्या महिलेला इजा करू शकतात. त्यामुळे त्या महिलेची सुरक्षा महत्वाची आहे.
संबंधित महिलेला धमकावलं असण्याची, तिला दबावात घेतलं असण्याची शक्यता आहे. संजय शिरसाटांची वादग्रस्तात वाढत चालली असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे. महिलांना धमकविणारा, अशा प्रकारचे वर्तन करणारा, ज्यांच्या मुलांवर एवढे गंभीर आरोप झाले आहेत, असा माणूस तुमच्या मंत्रिमंडळात कसा असू शकतो, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.