
मुंबई, प्रतिनिधी
राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर वाढला असून, विशेषतः मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी, तसेच मुंबई व ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी संपर्क साधून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या जिल्ह्यांतील प्रशासनाशी देखील संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे.
“आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास कार्यरत ठेवावीत, अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहून मदत कार्यात तत्परतेने सहभागी व्हावेत,” असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आणि जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाण्याने भरलेले रस्ते, धोकादायक इमारती, विजेच्या तारा आणि पुलांची स्थिती यावर विशेष लक्ष ठेवावे, तसेच उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच सखल भागात राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. “प्रशासन सज्ज आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा मोठा प्रभाव जाणवत असून राज्य सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.