
पुणे प्रतिनिधी
पावसाळा तोंडावर असताना सिंहगडावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जून 2025 पासून सिंहगड किल्ल्यावर वनविभागाने नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे नियम लागू होणार असून त्याचे उल्लंघन केल्यास थेट दंडात्मक कारवाई होणार आहे.
प्लास्टिक बंदी, डिपॉझिट सिस्टम, अतिक्रमण हटाव मोहीम अशा काही महत्त्वाच्या उपाययोजना वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणार आहेत.
वनविभागाच्या नियमानुसार, 1 जूनपासून सिंहगडावर प्लास्टिकची कोणतीही वस्तू नेणे पूर्णपणे बंदीचे असेल. त्यामुळे आता पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागणार आहे. याशिवाय गडावरून खाली येताना प्लास्टिक न नेता टाकणाऱ्यांना दंड आकारला जाईल.
वनसंरक्षक दीपक पवार यांनी स्थानिक विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील 8 दिवसांत प्लास्टिकमुक्तीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगड किल्ल्यावर झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याशिवाय काही विक्रेत्यांना आधीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात वनविभाग, पुरातत्त्व विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीनंतर सिंहगडासह इतर किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने शिस्तबद्ध पर्यटनासाठी कडक नियमांची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या पर्यटकांना आता केवळ सूचना नाही, तर दंडाची शिक्षाही होऊ शकते.