वृत्तसंस्था
भारतीय नौदलाची शान आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेली युद्धनौका INS विक्रांत सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यामुळे तिच्या क्षमतेबद्दल सर्वत्र कौतुक सुरू आहे. शत्रूला जेरीस आणणाऱ्या या विमानवाहू नौकेने नौदलाच्या सामर्थ्याची नवीन व्याख्या घडवली आहे.

“स्वदेशी बनावटीची ताकद”
INS विक्रांत ही पूर्णपणे भारतात तयार झालेली पहिली विमानवाहू नौका आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची रचना व बांधणी केली असून ती स्वदेशी विमानवाहू नौका प्रकल्पाचा (IAC-1) एक भाग आहे. 1999 साली या प्रकल्पाची सुरुवात झाली, 2011 मध्ये विक्रांत पाण्यात उतरली आणि 2013 मध्ये तिची बांधणी पूर्ण झाली. विविध चाचण्या आणि सुधारणा केल्यानंतर 2023 मध्ये ही नौका अधिकृतपणे भारतीय नौदलात दाखल झाली.

“इतिहासाशी जोडलेले नाव”
विक्रांत हे नाव नविन असले तरी यामागे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात INS विक्रांत (R-11) ने पाकिस्तानच्या कराची बंदरावर निर्णायक हल्ला केला होता. त्याच परंपरेला पुढे नेत 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या INS विक्रांतचे जलावतरण करण्यात आले.
“भव्य रचना आणि आधुनिक सुविधा”
* INS विक्रांतची रचना हीच तिची ताकद आहे:
* लांबी: 262 मीटर (सुमारे 3 फुटबॉल मैदानांच्या लांबीइतकी)
* रुंदी: 62 मीटर
वजन: अंदाजे 45,000 टन
कमाल वेग: 52 किमी/तास
एकावेळी पार्क होणारी विमाने: 30 लढाऊ विमाने
खलाशी क्षमता: 1600 खलाशी (यात 160 अधिकारी आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था)
* या नौकेवरून लढाऊ विमाने उड्डाण करू शकतात आणि क्षेपणास्त्रे डागून शत्रूवर जोरदार हल्ले करू शकतात.
” खर्च आणि गुंतवणूक”
INS विक्रांतच्या निर्मितीसाठी सुमारे 193 अब्ज 41 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. ही गुंतवणूक केवळ एका युद्धनौकेसाठी नसून, भारताच्या सागरी सुरक्षेसाठी, आत्मनिर्भरतेसाठी आणि जागतिक सामर्थ्यसिद्धीसाठी आहे.
“देशाच्या सागरी सुरक्षेचा अभेद्य कवच”
INS विक्रांत ही केवळ एक नौका नाही, ती भारताच्या नौदलाची आधुनिक रूपातली ओळख आहे. शत्रूवर दहशत निर्माण करणाऱ्या या स्वदेशी युद्धनौकेमुळे भारताची सागरी ताकद अधिक भक्कम झाली आहे.


