
मुंबई प्रतिनिधी
ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर पाकिस्तानने चवताळून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेले दोन दिवस पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरू असतानाही भारतीय लष्कराने त्यांचा यशस्वी प्रतिकार केला असून, भारतानेही इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीसह अनेक पाकिस्तानी शहरांवर तीव्र हवाई हल्ले चढवले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
देशातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने सर्वत्र अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि अंबाला परिसरातील सीमावर्ती गावांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. तसेच देशभरातील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरातही याचे पडसाद उमटत असून, किनारपट्टी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने मुंबई पोलिसांनी समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्गांवर गस्त वाढवली आहे. सागरी भागात ‘सागरी कवच’ मोहीम सुरू करण्यात आली असून, ड्रोन्स आणि सीसीटीव्हीच्या मदतीने सतत नजर ठेवली जात आहे.
मुंबई पोलिसांनी मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणतीही अनधिकृत हालचाल समुद्रामार्गे होऊ नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बोटींच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
सध्या देशभरात युद्धजन्य परिस्थिती असून, केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. मुंबईसह सर्व मोठ्या शहरांमध्ये सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.