
मुंबई प्रतिनिधी
रभारत-पाकिस्तान दरम्यान सीमारेषेवर तणाव वाढत असताना, मुंबईतही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब समोर आली आहे. साकीनाका परिसरात रात्री एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे.
सहार विमानतळ येथून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात माहिती मिळताच, साकीनाका पोलीस आणि सीआयएसएफच्या पथकांनी तातडीने कारवाई केली. प्राथमिक माहितीनुसार, हजरत तैय्यब जलाल मस्जिदच्या परिसरात रात्रीच्या सुमारास हा ड्रोन दिसून आला. काही क्षणांतच तो झोपडपट्टीच्या दिशेने निघून गेला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
या पार्श्वभूमीवर, साकीनाका पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पहाटे पाच वाजता हरी मस्जिद परिसर, जरीमरी येथे सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, अद्याप संशयास्पद ड्रोन किंवा इतर कोणताही संशयित प्रकार आढळून आलेला नाही.
सध्या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई पोलिस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबईतल्या या घडामोडीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असली, तरी सुरक्षेसाठी पोलिसांनी पावले उचलल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.