
सातारा प्रतिनिधी
जम्मू- काश्मीर येथील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पोलीस मुख्यालयात बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांच्या आदेशाने सातारा जिल्हा ‘अलर्ट मोड’वर असून, संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या आढावा बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र सावंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, “जिल्ह्यात सध्या शांततेचे वातावरण असून, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांनी सज्ज आणि सतर्क राहावे. नागरिकांमध्ये घबराट निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.”
सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढविणे, वाहतूक नियंत्रण, महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती, वॉच टॉवर्स आणि सीसीटीव्ही प्रणालींची चाचणी यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरेने प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांनी तयारीत रहावे, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक व निरीक्षकांशी व्हिडीओ पहा कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रत्येक विभागात काय स्थिती आहे, कोणते उपाय सुरू आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.