
सातारा प्रतिनिधी
सातारा|पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असताना, सातारा जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस मुख्यालयात भेट दिली.
या आढावा बैठकीला प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपाधीक्षक (गृह) अतुल सबनीस, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र सावंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यात शांततेचे वातावरण असून कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली. वाहतूक व्यवस्था नीट ठेवावी आणि नागरिकांमध्ये अनावश्यक गोंधळ किंवा भीती पसरू न देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि निरीक्षकांशी संवाद साधून त्यांनी जिल्ह्याच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतला.
सध्या जिल्ह्यात सर्वत्र शांतता असून, नागरिकांचा दिनक्रम सुरळीत सुरू आहे, हे पाहता सुरक्षा यंत्रणांनी सजग राहून जनतेचा विश्वास कायम राखावा, असेही ते म्हणाले.