
सातारा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या पुढाकाराने त्रिपुरा राज्यातील गट-अ सेवेतील ३१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा सातारा जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आला. या दौऱ्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती, योजना अंमलबजावणी व नवोन्मेषी उपक्रम यांची प्रत्यक्ष माहिती घेणे हा होता.
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. दौऱ्यादरम्यान विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली.
या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना आणि कार्यपद्धती विषद केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांनी ग्रामपंचायतींतर्फे राबविल्या जाणाऱ्या अभिनव उपक्रमांची माहिती दिली. महिला व बालकल्याण योजना रोहिणी ढवळे यांनी सादर केल्या, तर आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश उगले यांनी केली, तर सूत्रसंचालन अंजली गोडसे यांनी केलं.
या कार्यक्रमास यशदा, पुणे येथील संशोधन अधिकारी भाऊसाहेब बहिरट, महेश कांत यादव, प्रकाश पाटील आणि प्रशिक्षक प्रवीण यांची विशेष उपस्थिती होती.