
मुंबई प्रतिनिधी
राज्यात आज हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी तसेच माहिम, माटुंगा, दादर या भागात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. दक्षिण मुंबई, कोस्टल रोड परिसर आणि आसपासच्या भागांत वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेक ठिकाणी धावपळीचे चित्र निर्माण झाले. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनसेवा 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. ठाणे ते पनवेल, ठाणे ते कल्याण तसेच सीएसटी मार्गावरील लोकल सेवेवर याचा थेट परिणाम झाला आहे.
सध्या मुंबईतील कोस्टल रोड परिसरात वाऱ्याचा जोर आणि पावसाचा मारा सुरू असून नागरिकांना वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळच्या पीक अवरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा धोका कायम आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावली असून याचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसला आहे. डहाणू आणि पालघर परिसरात जवळपास 40 ते 45 बोटींचे नुकसान झाल्याचेही माहिती समोर आली आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.