
कल्याण, प्रतिनिधी
योगीधाम परिसरातील गेटेड कॉम्प्लेक्समधील एका १९ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका अज्ञात महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, संबंधित महिला स्थानिक रहिवासी नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ३५ वर्षांची ही महिला लिफ्टमधून १७ व्या मजल्यावर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही. पोलिसांनी परिसरातील सोसायटील रहीवाशांसी द
संपर्क साधून मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
योगीधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले की, “शनिवारी दुपारी एक अनोळखी महिला १७ व्या मजल्यावरून उडी मारून खाली पडली. ती येथील रहिवासी नसल्याची माहिती आम्हाला मिळाली असून ती बाहेरून येथे आली होती.”
घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नसून, ती या इमारतीत कशी आली? तिचे येथे येण्यामागचे कारण काय? आणि तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.