
पुणे प्रतिनिधी
भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास देणाऱ्या एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (२५) असे या आरोपीचे नाव असून, त्याला पुण्यातील भोसरी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार अश्लील मेसेज आणि कॉल येत असल्याने त्यांच्या कार्यालयाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत आरोपीच्या लोकेशनचा मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपी भोसरीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
आरोपी अमोल काळे याने चौकशीत पंकजा मुंडे यांना कॉल केल्याची कबुली दिली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS) कलम ७८ व ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विद्यार्थीदशेत असून, त्याने हे वर्तन नेमकं का केलं याचा तपास सुरू आहे.
अमोल काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असून, सध्या तो पुण्यात वास्तव्यास होता. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.