
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात रविवारी दुपारी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या सात गाड्या आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने, आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, कार्यालयाच्या एका विभागात ही आग लागली. आग लागल्याचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र अधिकृत निष्कर्षासाठी तपास सुरू आहे. ईडीचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, या कार्यालयातून गेल्या काही महिन्यांत देशभरातील अनेक गाजलेले आर्थिक घोटाळ्यांचे तपास काम सुरू होते. यात विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपनीज बँक फसवणूक, महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप मनी लॉन्ड्रिंग, सहारा ग्रुप मनी लॉन्ड्रिंग, एरोस इंटरनॅशनल मीडिया फंड डायव्हर्जन, साई ग्रुप हाउसिंग घोटाळा, ललित टेकचंदानी बँक फसवणूक, पेन को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मनी लॉन्ड्रिंग, उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड बँक फसवणूक, मोनार्क युनिव्हर्सल ग्रुप फसवणूक, विनोद खुटे पोंजी स्कीम आणि पीएमसी बँक फसवणूक यांसारख्या प्रकरणांचा समावेश आहे.
यामुळे अनेक संवेदनशील फाईल्स आणि दस्तऐवजांचे संरक्षण झाले आहे का, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. ईडीने मात्र प्राथमिक प्रतिक्रिया देताना सर्व महत्त्वाचे कागदपत्र आणि डिजिटल डेटाची सुरक्षितता अबाधित असल्याचा दावा केला आहे.
घटनास्थळी आगीच्या तपासणीसाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. आग नेमकी कशी लागली, याचा सखोल तपास होणार असून नुकसानीचा अंदाज आणि पुढील कारवाईबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार आहे.