
नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील कपिलनगर आणि अंबाझरी ठाण्यांतर्गत घडलेल्या घटना गंभीरतेने घेण्यात आल्या. तपासात तेथे तैनात डीबी पथकाची निष्क्रियता समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांनी दोन्ही ठाण्यांतील संपूर्ण डीबी पथकच बरखास्त केले असून कर्तव्यनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच एमआयडीसी ठाण्यातील तीन पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वाढत्या गुन्हेगारीसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच पोलिस ठाण्यात तैनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामात निष्काळजीपणा होत असल्याची बाब पुढे आली आहे. पोलिस आयुक्तांनी हे सर्व गंभीरतेने घेतले असून पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळून आला तर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिस आयुक्तांनी म्हटले की, ठाण्यात तैनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक हालचालीची माहिती ठेवली पाहिजे. ठाण्यांतर्गत नियमित गस्त घालून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण केली पाहिजे.
डीबी पथकाची निष्क्रियता
19 एप्रिलला कपिलनगर ठाण्यांतर्गत म्हाडा कॉलनी चौकात वर्दळीच्या ठिकाणी एका प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आली. 16 मार्चला अंबाझरी ठाण्यांतर्गत पांढराबोडीत खुनाची घटना घडली. त्यानंतर 15 एप्रिलला धरमपेठ परिसरात कॅफे संचालकाची गोळी मारून हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणांत ठाण्यांत तैनात डीबी पथकांची निष्क्रियता पुढे आली आहे.
प्रत्येक गुन्हा गंभीरतेने घ्या, नवीन पथकाला निर्देश
कोणताही गुन्हेगार पोलिसांपासून वाचायला नको. गुन्हे आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. नागरिकांची सुरक्षा पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येक गुन्हा गंभीरतेने घेतला पाहिजे. केवळ हे दोनच नाहीतर तर शहरातील सर्व ठाण्यांत तैनात डीबी पथकांच्या कामांचे मूल्यांकन केले जाईल. पथकातील कर्मचाऱ्यांना लोकांमध्ये जाऊन गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित अडचणी जाणून घ्याव्या लागतील मात्र तो अभाव दिसून येत असल्याने पोलीस आयुक्तांनी डीबी पथकच बरखास्त केलं आहे तसेच तीन अधिकाऱ्यांना निलंबित केला आहे.