
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रजमध्ये भररस्त्यात तीन जणांनी एका तरूणाची लाठ्या काठ्यांनी क्रूर हत्या केली. जागेच्या वादातून २३ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
मृत तरूणाचे नाव शुभम सुभाष चव्हाण असे आहे. या घटनेनंतर आंबेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा धाक राहिला की नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय. रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून २३ वर्षीय शुभमची शुभमची हत्या केली.
पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. जागेच्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून शुभमचा जीव घेतला. काठी, स्टंप आणि लाकडी दांडक्याने आधी शुभमला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दगडानेही गंभीर जखमी केले. या क्रूर हल्ल्यात शुभम याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली.
शुभमच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “आमचा शुभम कोणाशीच भांडण करणारा नव्हता. तो सगळ्यांशी प्रेमाने वागायचा. असं कोण क्रूरपणे त्याचा जीव घेईल, यावर विश्वासच बसत नाही,” असे शुभमच्या कुटुंबाने म्हटलेय. पोलिसांकडून शुभमच्या मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, जागेच्या वादातून हे भयंकर कृत्य घडले आहे.
आंबेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपी अमर साकोरे आणि त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत.
“आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल,” असे आंबेगाव पोलिसांनी सांगितले.