
मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे भायखळा येथील मुख्यालयात आयोजित वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात पार पडली. या कवायत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संघ, फोर्ट अग्निशमन केंद्राला पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी, “मुंबईच्या अग्निसुरक्षेसाठी मुंबई अग्निशमन दल सक्षम आणि सज्ज आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या स्पर्धेत विविध अग्निशमन केंद्रांतील जवानांनी आपली कौशल्ये दाखवून दिली. “हे जवान केवळ स्थानिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्पर्धा जिंकण्याची क्षमता ठेवतात. लवकरच अशा एका संघाची निर्मिती करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण दिले जाईल,” अशी माहितीही डॉ. सैनी यांनी दिली. यंदाचे वर्ष प्रशिक्षण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून कांदिवली येथे विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उप आयुक्त प्रशांत गायकवाड, विशेष कार्य अधिकारी चंद्रशेखर चोरे, अभिनेता सोनू सूद, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिनेता सोनू सूद यांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक करताना, “लाखो लोकांचे प्राण वाचवणारे हे जवानच खरे नायक आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
अग्निशमन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत, अशी माहिती प्रमुख अधिकारी आंबुलगेकर यांनी दिली.
या वेळी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्यासह इतर अधिकारी व जवानांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख विजेते:
फायर पंप ड्रिल: प्रथम – गोवालिया टॅंक केंद्र,
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल: प्रथम – फोर्ट केंद्र,
महिला फायर पंप ड्रिल: प्रथम – विक्रोळी केंद्र,
महिला लॅडर मोटर पंप ड्रिल: प्रथम – नरिमन पॉईंट केंद्र,
सर्वोत्कृष्ट संघ: फोर्ट अग्निशमन केंद्र,
सर्वोत्कृष्ट अग्निशामक: केंद्र अधिकारी अमोल मुळे.
मुंबईच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाच्या कामगिरीला या स्पर्धेद्वारे एक नवा आयाम लाभला आहे.