
इस्लामपूर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष, तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संस्थापक विजयसिंह महाडिक (वय ६५) यांचा आज येथे राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.
काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाघवाडी रस्त्यावरील अभियंतानगरमध्ये ही घटना घडली.
वाळवा व पलूस पंचायत समितीच्या बांधकाम विभागात अभियंतापदी त्यांनी काम केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. येलूर (ता. वाळवा) गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाडिक अभियंतानगर येथील बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी ११ च्या दरम्यान गेले होते. तीव्र उन्हाने चक्कर आल्याने तोल जाऊन ते खाली पडले. त्यांना गंभीर इजा झाली.
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, आधार रुग्णालयाच्या डॉ. कविता माळी यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. मराठा आरक्षणासाठी १९९६ पासून महाराष्ट्रात चळवळ उभी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेऊन मराठा आरक्षण चळवळीत योगदान दिले. २००५ मध्ये सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाआऊंचा पुतळा बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
२००६ पासून मराठा आरक्षण चळवळ महाराष्ट्रभर व्यापक केली. पानिपत येथे शौर्य दिन साजरा करून मराठ्यांची ताकद वाढविली. २००७ पासून त्यांनी मराठा आरक्षणासह विविध २७ मागण्या घेऊन सरकारवर दबाव आणला. २००८ पासून मराठा मंत्री व आमदारांना भेटून समाजाला आरक्षणाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या प्रत्येक आयोग व समितीला त्यांनी माहिती देऊन समाजाचे मागासलेपण पटवून देण्याचा प्रयत्न केला.
२०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावी कराड येथे २०१६ मध्ये मराठा समाजाला आरक्षणासाठी नऊ दिवस उपोषण केले. महाराष्ट्रातील ४२ संघटना एकत्रित करून आरक्षण समन्वय समिती स्थापन केली. महाडिक भावकीला एकत्र करून सरदार हरजीराजे महाडिक यांची जयंती व पुण्यतिथी सुरू केली. महाडिक यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्तहोत आहे.