
मुंबई, प्रतिनिधी
कांदिवली परिसरातील काही स्थानिक रहिवाशांनी भटक्या श्वानांचा त्रास वाढल्याच्या कारणावरून तब्बल २० श्वानांना कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता थेट आरेच्या जंगलात सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईतील प्राणीप्रेमींनी या श्वानांसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत नऊ श्वानांना वाचवण्यात यश आले असून, दुर्दैवाने दोन श्वानांचा मृत्यू झाल्याचे समजते. मृत श्वानांवर बिबट्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भातील ध्वनिचित्रफीती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने प्रकरण उघडकीस आले. स्थानिकांनी श्वानांना टेम्पोमध्ये भरून आरे जंगलात सोडल्याचे यात स्पष्टपणे दिसत आहे. याप्रकरणी संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२८ आणि ४२९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलीसांकडून सहकार्याचा अभाव
प्राणीप्रेमींनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली असली तरी, पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण शोधमोहीम प्राणीप्रेमींच्या पुढाकारातून सुरू असून, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.
श्वानांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
आरे जंगलात बिबट्या, कोल्हे, माकड यांसारखे वन्य प्राणी वास्तव्य करत असल्याने या परिसरात श्वानांचे अस्तित्व धोक्यात येते. तसेच, अन्न व पाण्याची टंचाई, संसर्गजन्य आजारांचा धोका आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम हे गंभीर मुद्दे आहेत.
“श्वानांना जंगलात सोडणे म्हणजे त्यांना मृत्यूपंथाला लावण्यासारखे आहे,” असे मत प्राणीप्रेमी रेश्मा शेलटकर यांनी व्यक्त केले.
या अमानुष कृतीमुळे संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.