
उमेश गायगवळे, मो, ९७६९०२०२८६
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही आपल्या देशातील अनेक आदिवासी भाग अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी हे त्याचं ज्वलंत उदाहरण ठरत आहे. या गावात रस्ता नाही, आरोग्यसेवा नाही, वीज-पाणी तर दूरचीच गोष्ट. या साऱ्याचा परिणाम म्हणजे आजही येथील रुग्णांना बांबूच्या झोळीतून डोंगर-दऱ्यांतून पायपीट करत उपचारासाठी नेताना दिसतात.
अलीकडेच घडलेली एक घटना महाराष्ट्राच्या व्यवस्थेला चपराक मारणारी ठरली. केलापाणी गावातील १८ वर्षीय रेंगीता आट्या चौधरी या तरुणीला पोटदुखीमुळे अतोनात वेदना होत होत्या. रस्त्याचा अभाव असल्याने रुग्णवाहिका पोहोचणे शक्य नव्हते. अखेर गावातील काही तरुणांनी एकत्र येत बांबूची झोळी तयार केली आणि रेंगीताला खांद्यावर घेत १५ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करून तिला तोरणमाळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवलं.
या प्रवासात फक्त अंतराचं नाही, तर खोल दऱ्या, उंच डोंगर, घनदाट जंगल, जंगली प्राणी – या सर्वांचा सामना करत आठ-दहा तरुणांनी ही जबाबदारी पार पाडली. हा प्रसंग केवळ एक अपवाद नाही, तर केलापाणी गावातील दररोजचा संघर्ष आहे. गेल्या दोन महिन्यांत अशीच ही तिसरी घटना. याआधी एका गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली होती आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला होता.
या साऱ्या घटनांनी शासनाच्या ‘विकासाच्या’ दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये आदिवासी विकासासाठी खर्च केले जातात. मात्र, केलापाणीसारख्या गावांपर्यंत अजूनही विकास पोहोचलेला नाही हे या घटना स्पष्टपणे दाखवतात.
“आम्ही जगायचं तरी कसं?” – असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. पिण्याचं पाणी नाही, वीज नाही, रस्ता नाही, आरोग्य केंद्र तर दूरची गोष्ट. वारंवार मागण्या करूनही सरकारकडून केवळ आश्वासनं मिळतात. प्रत्यक्ष कृतीचा अभाव आज या समाजाला मृत्यूच्या दाढेत ढकलतो आहे.
केलापाणीच्या या कहाणीने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावलं पाहिजे. हा फक्त नंदुरबार जिल्ह्याचा प्रश्न नाही, तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेच्या असमर्थतेचं प्रतिबिंब आहे. मरण यातनांचा हा प्रवास आता थांबायला हवा, आणि त्यासाठी केवळ लेख, बातम्या नव्हे, तर ठोस कृती गरजेची आहे.