
लेख, उमेश गायगवळे
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय समाजव्यवस्थेतील एक थोर क्रांतिकारक, विधीमर्मज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य शोषित, वंचित, मागास आणि दलित वर्गाच्या सक्षमीकरणासाठी समर्पित केले. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते लहानपणापासूनच अस्पृश्यतेच्या विखारी सामाजिक वास्तवाचा अनुभव घेत होते. हीच वेदना त्यांना सामाजिक समतेच्या लढ्याचे शस्त्र बनून दिली.
डॉ. आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी तयार केलेले संविधान हे केवळ कायद्याचे दस्तऐवज नसून, समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारे तत्वज्ञान आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी, कामगारांच्या कल्याणासाठी आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले.
सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी माध्यमाचाही प्रभावी वापर केला. त्यांनी “मूकनायक”, “बहिष्कृत भारत”, “जनता” आणि “प्रबुद्ध भारत” ही वर्तमानपत्रे सुरू करून समाजजागृतीचे कार्य केले. या पत्रांद्वारे त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण आणि विषमता यांच्यावर प्रहार केला. ही वर्तमानपत्रे केवळ बातम्या पोहोचवण्याचे माध्यम नव्हती, तर ती समाजमनाला जागं करणारी चळवळ होती.
त्यांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून समतेचा मार्ग निवडला आणि लाखो अनुयायांनाही त्या मार्गावर नेले. त्यांच्या कार्यामुळे भारतात एक नवीन सामाजिक जागृती निर्माण झाली.
आजच्या काळात बाबासाहेबांची विचारसरणी अधिकच महत्त्वाची ठरते. सामाजिक विषमता, आर्थिक दरी, आणि जातीय द्वेषाच्या विरोधात लढण्यासाठी आंबेडकर विचार हे प्रकाशस्तंभासारखे मार्गदर्शन करतात. त्यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धची एक अखंड लढाई आणि मानवतेसाठीचा एक महान आदर्श.